राजेंद्र गर्दे - शुन्य ते शिखर गाठणारे बहुआयामी व्यक्तिमत्त्व

  • पत्रकार मित्र राजेंद्र गर्दे यांचे अभिष्टचिंतन •

अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत सुद्धा जिद्द , चिकाटी , खडतर मेहनत करण्याची तयारी व अनेकदा मानहानी, व्यक्तीगत अपमान याने खचुन न जाता दमदारपणे वाटचाल करण्याची धाडसी वृत्ती यामुळे सर्वसामान्य माणूस यशाचे शिखर कसे गाठू शकतो याचे चालते बोलते उदाहरण म्हणजे माझे गेल्या अनेक वर्षापासून अत्यंत जिव्हाळ्याचे असलेले स्नेही धुळ्यातच नव्हे तर संपूर्ण उत्तर महाराष्ट्रात पत्रकारिता क्षेत्रात नावलौकिक व दबदबा निर्माण करणारे श्री.राजेंद्र उत्तम गर्दे.

हाडाचा शिवसैनिक -  राजुभाऊंची ओळख आज सर्वत्र पत्रकार म्हणून असली तरी त्यांना खूप आधीपासून ओळखणाऱ्या सर्वांना त्यांची ओळख कट्टर हिंदुत्ववादी शिवसैनिक अशी आहे. स्वर्गीय हिंदूहृदयसम्राट वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांचे कट्टर समर्थक असलेले राजुभाऊ शिवसेनेच्या शाखांचे उद्घाटन, मोर्चे, आंदोलने, मान्यवर शिवसेना नेत्यांचे दौरे याप्रसंगी आवर्जून उपस्थित राहायचे व आपल्या निडर व धडपड्या व्यक्तीमत्वामुळे अनेकांच्या कौतुकाचा विषय व्हायचे. आमचे राजुभाऊ आज निःपक्ष पत्रकारीतेत असुन आजही वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांच्या परखड व सडेतोड विचारांचा वारसाा जपताना दिसतात. पितृतुल्य बाळासाहेब ठाकरे यांचे दु:खद निधनानंतर त्यांच्या स्मरणार्थ राजु भाऊंनी स्वतः मुंडण केले होते याची आठवण त्यांच्या सर्व मित्रांना असेलचं.

मेहनत व जिद्दीने शुन्य ते शिखराचा प्रवास - राजुभाऊ पत्रकारीतेत येण्यापूर्वी सतिष सॉल्व्हंट प्लान्ट या साक्री रोडवरील कंपनीत नाईट वॉचमन म्हणून नोकरीस असल्याचे माझ्या स्मरणात आहे. पुढे काही कारणाने ही कंपनी बंद पडल्याने राजुभाऊंनी सांजदैनिक श्रम राज्याचे संपादक कॉम्रेड मनोहरभाऊ पाटील यांच्या सहकार्याने दैनिकाचे वितरण व प्रेस फोटोग्राफी करण्यास सुरुवात केली व हाच त्यांच्या खडतर जीवनाचा मोठा 'टर्निंग पॉइंट' ठरला. या माध्यमातून सर्वदूर झालेला परिचय व झालेले दृढ संबंध यांच्या जोरावर पुढे यशाची अनेक दालने उघडली असल्याचे दिसून येते. नावलौकिक, धनसंपदा, मानमरातब प्राप्त करुन देणारे लोकप्रिय 'दैनिक मर्डर' दैनिक 'खान्देश खबर' हे राजु भाऊंच्या भात्यातील अमोघ असे बाण आहे. हे अमोघ बाण हातात घेऊन सतिष सॉल्व्हंट प्लान्ट मध्ये वॉचमन असलेले राजु भाऊ सर्वसामान्य जनतेच्या हितांचे, अधिकारांचे डोळ्यात तेल घालून अहोरात्र रक्षण करणारे वॉचमन झाले आहेत हे अत्यंत अभिमानाने नमूद करावेसे वाटते. 

मोठा जनसंपर्क - पत्रकारीतेत टेबलासमोर बसुन टेबल पत्रकारिता करण्यापेक्षा प्रत्यक्ष घटनेच्या ठिकाणी ताबडतोब जाऊन घटनेचा वेध घेऊन संपूर्ण घटनेचे वास्तववादी लिखाण व दृश्य वाचकांपर्यंत पोहोचवणे हे आपले ध्येय मानणाऱ्या थोड्याच पत्रकारांमध्ये राजु भाऊंच्या अग्रक्रम आहे. त्यामुळेच पोलीस विभागातील, प्रशासनातील सर्व अधिकारी कर्मचारी, राजकीय क्षेत्रातील राज्य, जिल्हा, व तालुक्यातील सर्वपक्षीय राजकीय नेते तसेच कार्यकर्ते तसेच धार्मिक व सामाजिक क्षेत्रातील विविध कार्यकर्त्यांशी असलेला त्यांचा परिचय व स्नेहाचे संबंध स्तिमित करणारे आहेत.



पत्रकारीता आणि सेवानिवृत्ती - राजुभाऊ गर्दे आज वयाची एकोणसाठ वर्षे पूर्ण करीत आज साठीकडे पदार्पण होत आहे. पत्रकारीता करतांना मात्र जेवढे वय जास्त तेवढी प्रगल्भता व अनुभव जास्त त्यामुळे पत्रकारीतेत वयाने व अनुभवाने हा टप्पा गाठणे म्हणजे अतिशय मोलाची गोष्ट असते अशावेळी स्वैर व भडक लिखाणापेक्षा आपल्या लेखनातून वाचकांच्या मनात अत्यंत प्रभावीपणे चांगले विचार रुजविणे अपेक्षित असते. राजु भाऊ आपल्या दैनिक मर्डर व खान्देश खबरच्या माध्यमातून आजवर असे विचार प्रभावीपणे मांडतांना दिसतात व यापुढेही त्यांनी आपल्या प्रकृतीची जास्त काळजी घेऊन कार्य निरंतर सुरूच ठेवावे. राजुभाऊंचे सुपुत्र श्री.राकेश गर्दे व त्याची टिम या दोन्ही दैनिकांची जबाबदारी अत्यंत सक्षमपणे निभावतांना दिसतात. राजु भाऊंनी आजवर घेतलेल्या प्रचंड मैहनतीला तोड नाही परंतु या पुढे तब्येतीची जास्तीत जास्त काळजी घेऊन आवश्यक तितका आराम करुन फक्त मार्गदर्शकाची भूमिका पार पाडावी असे वाटते. 

अभिष्टचिंतन:- माझे परमस्नेही बालमित्र श्री.राजुभाऊ गर्दे आज वयाची ५९ वर्षे पूर्ण करुन ६० व्या वर्षात पदार्पण करीत आहे. त्यांना प्रभू श्रीराम कृपेने त्यांच्या पुढील आयुष्यात सुखसंपदा व आरोग्यसंपदा लाभो अशी सदिच्छा मित्रवर्य राजुभाऊला वाढदिवसाच्या अनंत अनिरुद्ध शुभेच्छा ! 

जय महाराष्ट्र !


✍️ बिपीन वसंतराव अमृतकर (पत्रकार) 
• माजी अध्यक्ष - शिवराय मित्र मंडळ,धुळे
• माजी सहसंपादक - दै.मुलूख मैदान,धुळे
• संस्थापक - श्री बहुउद्देशीय युवक विकास मंडळ,धुळे
• संस्थापक कार्यकारिणी सदस्य - अ.भा.वाणी समाज प्रबोधन संस्था, धुळे 
• माजी कोअर कमिटी सदस्य - श्री.सद्गुरु पुण्यक्षेत्रम, निंब ता.अमळनेर जि.जळगांव 




Comments

Popular posts from this blog

सुधाकरआप्पा मोगलाईकर - ३३ वा स्मृतीदिन

श्री सिद्धी महागणपती - पाळधी