श्री सिद्धी महागणपती - पाळधी

श्री गणेशाय नमः 

श्री सिद्धी महागणपती पाळधी - जळगांव 

   जळगांव जिल्ह्यातील पाळधी गावाबाहेर सुरत ते नागपूर महामार्गालगत तसेच महामार्ग पोलिस चौकीच्या मागील भव्य अशा मोकळ्या जागेत श्री सिद्धी वेंकटेश देवस्थानचे विश्वस्त श्रीकांत मणियार यांच्या वतीने श्री सिद्धी महागणपतीचं भव्य देवस्थान उभारण्यात आले आहे. धुळे शहरापासून सुमारे 80 कि.मी. अंतरावर असलेल्या तिर्थस्थळी  मला दि.19 फेब्रुवारी 2024 रोजी माझी पत्नी सौ.स्वाती व पुत्र सौरभ यांचेसह गणपती बाप्पाच्या दर्शनाचा लाभ झाला. 

    या आगळ्यावेगळ्या भव्य अशा मंदिरात देशात कुठेही नाही एवढ्या म्हणजे तब्बल 31 फूट उंचीच्या श्री गणेशाच्या मूर्तीची गुरुवार 9 फेब्रुवारी 2023 रोजी संकष्टी चतुर्थीच्या दिवशी विधीवत प्राणप्रतिष्ठा करण्यात आली होती.         

     374 टन वजनाच्या एकाच अखंड काळ्या पाषाणात ही मूर्ती तयार करण्यात आली आहे. दक्षिण भारतात, ज्या ठिकाणी दगड मिळाला, त्याचठिकाणी मूर्तीकारांनी ती तयार केली असून तिला पूर्ण होण्यास दोन वर्षांचा काळ लागला. 100 टन एवढे या मूर्तीचे वजन आहे. तसेच या मूर्तीच्या आजूबाजूला 15 फूट उंचीच्या रिद्धी आणि सिद्धी यांच्या मूर्ती सुद्धा आहेत.

   आजूबाजूला रिद्धी-सिद्धी  असलेले आणि तर श्री गणेशाच्या सोंडेत अमृतकुंभ, पोटावर नाग, आणि कपाळावर घंटा अशी मूर्ती असलेले गणरायांचे हे देशातलं एकमेव मंदिर असल्याचं येथील विश्वस्त सांगतात.


  या मंदिराच्या गाभाऱ्या समोरचा सभामंडप अतिशय मोठा व सुंदर असुन या ठिकाणी गणपती बाप्पाच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना बसण्यासाठी खुर्च्या ठेवलेल्या असुन सभामंडपातील वातावरण थंड रहावे म्हणून छताला भव्य असे हेलिकॉप्टर फॅन बसविण्यात आले आहेत.


   तब्बल 200 किलो वजनाची घंटा सुद्धा याठिकाणी असून ही गणपती बाप्पाची विशालकाय मूर्ती आणण्यासाठी मुंबईतून क्रेन मागवण्यात आली होती. या भव्य अशा मंदिराचे वैशिष्ट्य म्हणजे आधी या मंदिराच्या गाभाऱ्यात मूर्ती ठेवण्यात आली, त्यानंतर मंदिर उभारण्याचे काम करण्यात आले.


   या मंदिराच्या गर्भगृहातील विराजमान गणपती बाप्पाच्या मुर्तीखाली जळगांव व परिसरातील सुमारे पाच हजार गणेशभक्तानी लिहिलेली 'ॐ गण गणपतेय नम:'  या गणेशमंत्राची 21 कोटी एवढी मंत्र लिहिलेली पुस्तके या विधीवत ठेवण्यात आली आहे.
   या मंदिराच्या गाभाऱ्याला बंदिस्त करण्यासाठी सुमारे 42 फुट उंचीचे स्वयंचलित रोलिंग शटर या ठिकाणी बसविले असुन या मंदिरात गणपती बाप्पाच्या मुर्तीची प्राणप्रतिष्ठापना करण्यासाठी राजस्थान,काशी तसेच वेगवेगळ्या राज्यांमधील 18 विद्वान पंडितांना  बोलावण्यात आले होते अशी माहिती मंदीरातील व्यवस्था कर्मचाऱ्याने दिली.

      या मंदिराचा परिसर अतिशय सुंदर व मोहक असुन या ठिकाणी भाविकांना बसण्यासाठी मंदिराच्या भोवती ठिकठिकाणी सोय करण्यात आलेली आहे. तसेच मंदिर परिसरात पूजा साहित्य, पेढे व प्रसाद, यांची काही दुकाने असुन एक उपहारगृह असल्याचे आढळून येते. 


        आपल्या धुळे शहरापासून सुमारे शंभर कि.मी. पेक्षा कमी अंतर असलेल्या या अतिशय सुंदर व आकर्षक अशा मंदिराला पुन्हा पुन्हा भेट देऊयात. 
         या मंदीराच्या गर्भगृहात स्थानापन्न झालेल्या दर्शनासाठी येणाऱ्या असंख्य भाविकांच्या दु:खांचे हरण करुन त्यांना संकट मुक्त करणाऱ्या विघ्नहर्त्या गणपती बाप्पाचे दर्शन व आशीर्वाद घ्यायलाच हवेत ना.....

|| ॐ गं गणपत्यै नमः ||

✍️ बिपीन अमृतकर (पत्रकार) 







Comments

Popular posts from this blog

राजेंद्र गर्दे - शुन्य ते शिखर गाठणारे बहुआयामी व्यक्तिमत्त्व

सुधाकरआप्पा मोगलाईकर - ३३ वा स्मृतीदिन