सुधाकरआप्पा मोगलाईकर - ३३ वा स्मृतीदिन


• ३२ वा स्मृतीदिन •
दि.१८ मार्च २०२४
कै.आप्पासाहेब सुधाकर संभाप्पा मोगलाईकर, धुळे 
 
 उत्तर महाराष्ट्रातील शिवसेनेचे ज्येष्ठ नेते माजी जिल्हाप्रमुख कै.सुधाकरआप्पा मोगलाईकर यांचा आज ३३ वा स्मृतिदिन आहे. आजच्या त्यांच्या स्मृतिदिनाच्या दिवशी त्यांच्या अनेक पावन स्मृती व जीवनपट डोळ्यासमोर एखाद्या चित्रपटाप्रमाणे तरळून गेल्याशिवाय राहत नाही. 

 मराठी माणसाच्या न्याय हक्कांसाठी मुंबई येथे प्रबोधनकार ठाकरे यांच्या सल्ल्याने व मार्गदर्शनाखाली वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांनी ८० टक्के समाजकारण व २० टक्के राजकारण हे ध्येय व सुत्र डोळ्यासमोर ठेवून १९ जून १९६६ साली शिवसेनेची स्थापना केली. बाळासाहेब ठाकरे यांनी मुंबईत व महाराष्ट्रात मराठी माणसाची होणारी पिछेहाट बघून मराठी मनात ज्वलंत हिंदुत्ववादी विचार आणि लढाऊ बाणा रुजवुन मराठी माणसाला ताठ मानेने उभे करून अन्यायाविरुद्ध पेटून उठण्याची शिकवण दिली. संपूर्ण महाराष्ट्रातून युवकांचे लोंढेच्या लोंढे बाळासाहेबांच्या विचारांनी प्रेरित होऊन शिवसेनेत दाखल होत होते. 
   मुंबईत स्थापन झालेल्या या शिवसेना नामक संघटनेची मराठी माणसाच्या मनात अन्यायाचा विरोध करण्याचा लढाऊ बाणा व जिद्द निर्माण करणारे बाळासाहेब ठाकरे यांचे ज्वलंत विचार यांची भुरळ महाराष्ट्रात सर्वत्र पसरत असतांना धुळ्यातील कै.देविदास सिताराम शार्दुल अर्थात बापूदादा शार्दुल, कै.सुधाकर संभाप्पा मोगलाईकर यांचे सोबत काही निवडक तरुणांना पडली त्यांनी तडक मुंबई गाठुन बाळासाहेबांची भेट घेऊन धुळे जिल्ह्यातील शिवसेनेची पहिली शाखा मनोहर चित्रपट गृहाजवळ सुरु केली असल्याचा इतिहास आहे. शिवसेनेच्या स्थापनेनंतर काही काळ मुंबई महानगरपालिका व इतर निवडणूका मध्ये शिवसेनेने काँग्रेस पक्षाशी युती केली होती परंतु वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांना काँग्रेसची ध्येय धोरणे लक्षात आल्यानंतर बाळासाहेब ठाकरे यांनी पुढे काँग्रेसची कायमची संगत सोडली. व यापुढे कधी काँग्रेस सोबत जाण्याची वेळ आली तर मी माझा पक्षच कायमचा बंद करीन अशी घोषणा केली. 
  
   यानंतर संपूर्ण महाराष्ट्रात खऱ्या अर्थाने शिवसेनेचा झंझावात सुरू झाला. गुणवत्ता असूनही वर्षानुवर्षे परप्रांतीयांच्या रेट्याने व लांगुलचालनाने फक्त निवडणुकीत प्रचाराकरिता वापरला जाणारा मराठी तरुण बाळासाहेबांच्या विचारांनी प्रेरित होऊन शिवसेनेत दाखल होऊन गावागावात शिवसेनेच्या शाखा सुरू करुन शिवसेनेचा 'शिवसैनिक' ही बिरुदावली अभिमानाने मिरवु लागला. त्या काळात शिवसेनेच्या शाखा म्हणजे मराठी माणसासाठी न्याय मंदिरे होती. 
  शिवसेनेचा संपूर्ण महाराष्ट्रात सुरू झालेला झंझावात बघुन प्रस्थापित काँग्रेस पक्षाचे धाबे दणाणले कारण अनेक गावांमध्ये कुटुंबातील वयोवृद्ध सदस्य काँग्रेस सोबत आणि तरुण मंडळी शिवसेनेसोबत असल्याचे चित्र निर्माण झाले. त्यामुळे गावागावात राजकीय समीकरणे बदलण्याची चाहूल काँग्रेसच्या नेत्यांना झाली. शिवसेनेची घोडदौड रोखण्यासाठी मग काँग्रेसने साम,दाम,दंड,भेद या नीतीचा अवलंब करुन शिवसेनेची आंदोलने, दडपण्याचा, शिवसैनिकांना गुंड ठरवुन त्यांना वेगवेगळ्या गुन्ह्यांमध्ये अडकवून पोलीसांचा ससेमीरा त्यांच्या मागे लावुन त्यांना शिवसेनेपासून तोडण्याचे प्रयत्न सुरू केले. परंतु वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांच्या शब्दाखातर सर्वस्वाचा त्याग करण्याची वृत्ती बाळगणाऱ्या मोगलाईकर आप्पा आणि बापूदादांसारख्या हजारो शिवसैनिकांना रोखणे त्या काळी काँग्रेसला शक्य होऊ शकले नाही. 

    कै.सुधाकरआप्पांच्या आयुष्यात अनेक खडतर प्रसंग आले. पण मुळाची साहसी वृत्ती असलेल्या सुधाकर आप्पांवर महादेव शिवशंभोची कृपा, महात्मा बसवेश्वर स्वामी आणि वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांचे आशीर्वाद व प्रत्येक प्रसंगात साथ निभावणारा बापू दादांसारखा जिवाभावाचा सहकारी ते कुठल्याही प्रसंगात कधीच डगमगले नाहीत. राजकीय कारकीर्दीत त्यांना अनेक पक्षांकडून व विरोधकांकडून आलेली प्रलोभने, संधी नम्रपणे नाकारतांना त्यांनी आपला प्रामाणिकपणा व मार्गदर्शक तत्वे कधीच सोडली नाहीत आणि शिवसैनिकांचा त्यांच्याप्रती असलेल्या विश्वासास कधीच तडा जाऊ दिला नाही. त्यामुळेच सुधाकरआप्पांना हिंदुह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी  धुळे जिल्हा प्रमुख (त्यावेळी नंदुरबार धुळे जिल्हा एकत्र होता) , शेतकरी सेनेचे महाराष्ट्र उपाध्यक्ष, शिंदखेडा विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी, धुळे नगरपालिकेत नगरसेवक, बांधकाम सभापती, आरोग्य सभापती होण्याची संधी दिली. 
   धुळे जिल्हा शिवसेनेत मोगलाईकर आप्पा आणि बापूदादा या शिवसेनेच्या दोन ढाण्या वाघांचा एवढा जबरदस्त दबदबा होता की, प्रस्थापित आणि दिग्गज असलेल्या विरोधकांची शिवसैनिकांवर अन्याय करण्याची हिंमतच होत नसे आणि कुठे अशी आगळीक कोणाकडून घडलीच तर या दोघा वाघांची ताबडतोब उमटणारी तीव्र प्रतिक्रिया बघून भल्याभल्यांना नमते घेऊनच माघार घ्यावी लागली होती याची असंख्य उदाहरणे मला त्यांचे सोबत सामान्य शिवसैनिक म्हणून वावरतांना अनुभवता आली. 
   
आजही आठवतो तो संपूर्ण महाराष्ट्रात आपल्या निराळ्या  वैशिष्ट्यांमुळे लोकप्रिय असलेला धुलीवंदनाचा दिवस त्या दिवशी आम्ही सर्व धुलीवंदनाचा, रंगोत्सवाचा मनसोक्त आनंद लुटुन घरी परतुन आराम करत असतांना निरोप आला की, मोगलाईकर नानांची (आप्पांना त्यांच्या परिवारात नाना म्हटले जाई)  तब्येत अचानक बिघडली असुन डॉक्टरांना घरी बोलावले आहे. आम्ही जवळ राहणारे शेजारी धावत त्यांच्या घरी पोहचलो तेव्हा डॉक्टर नानांना तपासुन बाहेर आले होते व त्यांनी सांगितले की आपले आप्पासाहेब आपल्या सर्वांना कायमचे सोडून निघून गेले आहेत. अगदी कोणाच्या संकटाची माहिती मिळताच ज्याप्रमाणे नाना मदतीसाठी कुणाला काही न सांगता निघून जात अगदी त्याचप्रमाणे देवाची हाक ऐकून अचानक सर्वांनाच कायमचे सोडून निघून गेले. विश्वासच बसत नव्हता की नानांची अशी अचानक एक्जीट होईल. त्यांच्या अचानक निघून जाण्याने त्यांच्या परिवाराला, एक कॉलनी एक परिवार  असेच वातावरण असलेल्या कॉलनी वासियांना आणि समस्त शिवसैनिकांना झालेले दुःख शब्दातीत आहे. माझा आदरणीय नानांशी असलेला नेहमीचा संवाद त्यांचा अनेक वर्षे लाभलेला सहवास त्यांच्या निघून जाण्याने खंडीत झाला.  मी स्वर्गीय नानांच्या प्रामाणिकपणा व सत्यवादी आदर्श तत्त्वांचा कट्टर पुरस्कर्ता असुन त्या तत्वांवरच आजतागायत माझी वाटचाल सुरू असल्याचे आज त्यांच्या ३२ व्या स्मृतीदिनी अभिमानाने सांगू इच्छितो. स्वर्गीय नानांच्या आदर्शवत राजकीय व सामाजिक कार्याची धुरा त्यांच्या परिवारातील त्यांचे सुपुत्र, स्नुषा, नातु अचूकपणे सांभाळत असल्याचे समस्त धुळेकरांना विदित आहेच. 
 मला माझ्या आजवरच्या आयुष्यात अनेक मान्यवरांकडून अनेक प्रेरणादायी व मार्गदर्शक गोष्टी आत्मसात करता आल्या त्यात आदरणीय मोगलाईकर नानांचे नांव अग्रभागी असल्याचे मी नम्रपणे सांगतो. 
  स्वर्गीय नानांच्या या ३२ व्या स्मृतीदिनी मी त्यांच्या असामान्य व्यक्तिमत्वाला, कर्तृत्वाला नतमस्तक होऊन अभिवादन करतो. 
    कै.सुधाकरआप्पांच्या पवित्र स्मृतींना भावपूर्ण आदरांजली ! 

(वरील श्रद्धांजलीपर लेखात स्वर्गीय सुधाकर आप्पांविषयी लिहितांना शिवसेनेविषयी कदाचित जास्त लिहीले गेले असेल, परंतु ज्यांचे जीवनाचा श्वास आणि ध्यास शिवसेना होती त्यामुळे त्यांच्याविषयी लिहितांना प्राधान्याने त्याही गोष्टींना तितकेच महत्व आहे असे माझे व्यक्तिगत मत आहे.) 

✍️ बिपीन वसंतराव अमृतकर (पत्रकार) 
• माजी अध्यक्ष - शिवराय मित्र मंडळ,धुळे
• माजी सहसंपादक - दै.मुलूख मैदान,धुळे
• संस्थापक - श्री बहुउद्देशीय युवक विकास मंडळ,धुळे
• संस्थापक कार्यकारिणी सदस्य - अ.भा.वाणी समाज प्रबोधन संस्था, धुळे 
• माजी कोअर कमिटी सदस्य - श्री.सद्गुरु पुण्यक्षेत्रम,     निंब ता.अमळनेर जि.जळगांव 





Comments

Popular posts from this blog

राजेंद्र गर्दे - शुन्य ते शिखर गाठणारे बहुआयामी व्यक्तिमत्त्व

श्री सिद्धी महागणपती - पाळधी